फॉर हिअर ऑर टू गो!!..
फ़ॉर हिअर ऑर टू गो!!
जनरली कोणत्याही रेस्टॉरंट मध्ये ,खास करून अमेरिकेतल्या बर्गर किंग, वेंडीज, फ़्रेंडलिज अशा उपहार गृहातून हा प्रश्न विचारला जातो. अर्थ साधाच, "इथेच खाणार की घेऊन जाणार?" पण साधारण ४०-४५ वर्षापूर्वी या ना त्या कारणाने देशान्तर करून आलेली मराठी मंडळी.. यांच्याबाबतीत हा प्रश्न तेव्हा ऐरणीवरचा होता. "फ़ॉर हिअर ऑर टू गो??" "इथेच रहायचं की परतायचं?"
मिलिंद प्रधान यांनी हे पुस्तक मला पाठवून दिलं आणि झपाटल्यासारखं मी ते वाचून काढलं. लेखिका अपर्णा वेलणकर. बृहन्महाराष्ट्र मंडळानं या पुस्तकाचा प्रकल्प आयोजित केला. काय कारण असावं? मंडळाचे अध्यक्ष लिहितात,"अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या मराठी समाज जीवनाची ही कहाणी आहे. भूतकाळात अनेक लेखक, साहित्यिक महारष्ट्रातून इथे आले, थोड्या वेळांत बर्याच ठिकाणी धावती भेट देऊन गेले. आणि त्या तुटपुंज्या अनुभवावर त्यांनी अमेरिकेतल्या समाज जीवनावर पुस्तके "पाडली." बृहन्महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. ठाणेदार यांनी या पुस्तकासाठी आर्थिक मदत पुरवली.."
एका अर्थाने, वर वर हिंडणार्या आणि त्यावर पानांचे ढिगारे रचणार्या लेखकांनी अमेरिकन मराठी माणसांबद्दलचे पसरवलेले गैरसमज दूर करण्याचा लेखिका प्रयत्न करते. पुस्तकात एक वाक्य आहे, "काठावर बसून गळ टाकून समुद्राच्या तळाबद्दल अंदाज बांधण्याचा प्रयत्न काय कामाचा? समुद्राच्या तळाशी काय काय आहे हे माहिती करून घ्यायचे असेल तर बुडी मारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही." वर वर पाहणार्या लेखकांना अमेरिका फ़क्त सुखासीन, भोगवादी, चंगळवादी दिसली.. अमेरिकन आयुष्यात फ़क्त स्वैराचार दिसला, उत्तानपणे छाती उघडी टाकून चालणार्या अमेरिकन मुली दिसल्या, त्यांच्या शरीराशी चाळे करणारे कामांध युवक दिसले.. मात्र अमेरिका म्हणजे फ़क्त इतकेच का? या प्रशाचे प्रश्नाचे रोखठोक उत्तर म्हणजे "फ़ॉर हीअर ऑर टू गो!"
लेखिका प्रारंभ करते विजय तेंडुलकरांपासून. २००३ साली जेव्हा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या न्यूयॉर्क अधिवेशनात डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे यांची जाहिर मुलाखत घेण्याच्या निमित्ताने लेखिकेचे अमेरिकेत पहिल्यांदा आगमन झाले. न्यूयॉर्क अधिवेशनात तेव्हा तेंडुलकर महनीय अतिथी होते. तेंडुलकरांशी गप्पा मारताना "मग? अमेरिका कशी वाटली?" या त्यांच्या काहीशा खोचक प्रश्नाने हे पुस्तक लिहिण्याचा पाया रोवला गेला असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. एक मात्र तेंडुलकरांनी सांगितलं ते म्हणजे की, "ए बी सी डी म्हणजे अमेरिका बॉर्न्ड कन्फ़ूज्ड/कॉन्फ़िडेंट देसी" म्हणजे अमेरिकेत जन्मलेली भारतीय वंशाची मुले यांच्यासोबतच त्यांच्या आई - वडीलांच्या पिढीशी आधी बोल... "
त्यानंतर जवळ जवळ वर्षभर लेखिका अमेरिकेतल्या वेगवेगळ्या प्रांतात, कॅनडा मध्ये हिंडली आणि जे जमवलं ते एकत्र करून शब्दबद्ध करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. आणि लेखिकेने ते योग्य तर्हेने पेललं आहे असंच म्हणावंसं वाटतं.
सुरूवात होते कॅनडामध्ये १९६४ साली नशिब आजमावण्यासाठी आलेल्या विनायक गोखले यांच्यापासून.
ब्रुक बॉण्ड चहा
लिंबाचं लोणचं
सुई-दोरा, बुटाची लेस
आणि डिक्शनरी..
४३ वर्षापूर्वीच्या डायरीमध्ये अजूनही जपून ठेवलेली काहीशी जीर्ण झालेली, ही यादी टोरान्टो मध्ये विनायक गोखल्यांच्या घरी अजूनही जपून ठेवलेली आहे. लेखिकेने तिच्या या दौर्यामध्ये हजारो मराठी माणसे पाहिली जी स्वातंत्र्योत्तर काळात देशान्तर करून आली. त्यांनी आपलं अस्तित्व जपण्यासठी केलेली धडपड, प्रसंगी जीवावर बेतलेले प्रसंग वाचतना नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होतात.
या प्रवासात मग येतात दिलीप चित्रे, नानासाहेब आणि तारा पटवर्धन आणि अशी बरीच मंडळी जी चाकरमानी होती पण जगण्याच्या वेगळ्या महत्वाकांक्षेपायी धोपटमार्ग सोडून पंख पसरण्याच्या उद्दीष्ट्याने देशाबाहेर पडली. नवी आव्हाने स्वीकारताना होणारी ससेहोलपट, डिस्क्रीमीनेशनचा फ़ुफ़ाटा, आणि त्यातूनही तावून सलाखून झळकणारं त्यांचं व्यक्तित्व. सगळंच विलक्षण. पुस्तकात लेखिका भारतातल्या अमेरिकेत येऊन शिक्षण घेणार्या पहिल्या वहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचेही चरित्र थोडक्यात सांगते. १८८३ साली बोटीने एक हिंदुस्थानी , नऊवारीतली स्त्री शिक्षण घेण्यासाठी ते ही एकटीने प्रवास करून येते, त्यातलं थ्रील आनंदी बाईंनी पत्र मैत्री जोडलेल्या "कार्पेंटर" बाईंनाही नविन होतं आणि इथल्या गारठलेल्या अमेरिकन शिष्टाचारात त्यांनी तितक्यात उबदारपणाने आनंदीचं न्यूयॉर्कच्या किनार्यावर स्वागत केलं.
पुस्तकात मग उल्लेख येतो तारा पटवर्धन या आजींचा. राम पटवर्धन उर्फ़ नानासाहेब. ते पर्मनंट मिशन ऑफ़ इंडीया टु युनायटेड नेशन्स" या संस्थेत काम करत होते. पंढरपूरात सगळा गोतावळा आणि नवविवाहीत पत्नी. नानांना घरून निर्वाणीचा निरोप आला, " आत्ताच्या आत्ता परत ये नाहीतर बायकोला घेऊन जा." पत्नीला बोलावून घेतले. मात्र राहण्याची सोय नव्हती. जीन पीयर्सन या हॉलिवूड तारकेला भारतीय संस्कृती, वेद, संस्कृत या बद्दल आकर्षण आहे असे ते ऐकून होते. भारतीय वकिलातीने दिवाळीच्या निमित्तने मेजवानीसाठी निमंत्रीतांची यादी केली होती त्यात नानांनी जीन पियर्सनचेही नाव घातले. आणि मेजवानीला ती आल्यावर तिची भेट घेऊन तिला संस्कृत शिकवण्याची तयारी दाखवली. मात्र त्याबदल्यात त्यांच्या पत्नीने अमेरिकेत जो गृहप्रवेश केला तो या जीन पिअर्सन च्या घरीच. हा अनुभव केवळ विलक्षण आहे. तारा पटवर्धन अजूनही न्यूयोर्कच्या एका भागात रहाताहेत.
लेखिकेने अशा सगळ्याच लोकांचे अनुभव इतके परिणाम कारक रितिने मांडले आहेत की आपणही त्या अनुभवातून जातो आहोत का अशी पुसटशी शंका यायला लागते.
अमेरिकेत जन्मलेल्या मराठी मुलांचे प्रश्न.. लेखिका म्हणते "ही मुलं मला कुठेही कन्फ़ूज्ड नाही दिसली, उलट आय एम प्राऊड अमेरिकन एण्ड आय रिस्पेक्ट माय इंडीयन रूट्स" असं स्वच्छ सांगणारी कॉन्फ़िडंट वाटली."
साधारण ४०-४५ वर्षापूर्वी केवळ आठ डॉलर्स, आणि वीस किलो सामान घेऊन आलेल्या या मंडळींनी आता तेवढ्या शिदोरीवर डोलारे उभे केले आहेत. भरली वांगी, बटाटे वडे , गोडाच्या शिर्यासोबत केक, पेस्ट्रीज, बर्गर, पिझ्झा यांच्याही चवीशी जीभेने मिळतंजुळतं घेतलं. नाहीतर थँक्स गिव्हिंची टर्की कशी चाखायला मिळाली असती??
आता ज्यांची अमेरिकन नातवंड आहेत अशा लोकांना मागे वळून पाहताना, "आय रिअली डीड ऑल दिस??" असे कृतार्था समाधानाचे सूर काढताना पाहून त्या काळात म्हणजे आयटी बूम नव्हती, माऊसच्या एका क्लिक वर जगाचे दरवाचे उघडत नव्हते आणि एच वन वाल्यांच्या इतकी भली थोरली पॅकेजेसही नव्हती.. त्या काळात त्यांनी घेतलेल्या कष्टाचे सार्थक झाल्याचे समाधान आपल्यालाही होते.
ही पिढी म्हणते, "अमेरिका तुम्हाला वेगळे मानत नाही, इथे येणारे तुम्ही स्वत: त्यांच्यापासून स्वत:ला वेगळे समजता. तुमच्या डोळ्यांवरची परिस्थितीची झापडं उतरवायचं काम अमेरिका व्यवस्थित करते. मेहनत करण्याला जवळ करते आणि मेहनतीत कमी पडणार्याला बाहेरचा रस्ता दाखवते. जितकं काम चांगलं तितका मोबदला .. असं सरळ सरळ गणित अमेरिका शिकवते."
या पुस्तकात बर्याच गोष्टी अशाही आहेत ज्यामध्ये अमेरिकेत आल्याचा पश्चातापही झालेली कुटुंबे आहेत. काही मुलांच्या बाबतीत झुरताहेत तर काही आई-वडीलांच्या शेवटच्या क्षणी त्यांना सोबत न करता आल्याचे ओझे अजूनही खांद्यावर घेऊन अपराधीपणाने जगताहेत.
अमेरिका कशी? लेखाकांनी पुस्तकातून दाखवली तशी की संधी देणारी.. म्हणजे लॅण्ड ऑफ़ ऑपॉर्चुनिटी??
पंचेचाळिस वर्षांपूर्वी चालू झालेली ही देशान्तराची झुंज .. म्हंटलं तर एकाकी म्हंटलं तर समूहाची.. पण तिची कहाणी विलक्षण आहे. या कहाणीच्या निरूपणात त्यांच्या राजरस्त्यांखाली दडलेल्या, देशान्तरीतांच्या पहिल्या पिढीच्या खडकाळ, उंचसखल पाऊलवाटा सध्याच्या एच वन पिढीच्या तरूणांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
हे पुस्तक ज्या क्षणी वाचून पूर्ण झालं त्या क्षणी नकळत डोळे मिटले गेले आणि हल्कीशी ओल पापण्यांवर आलेली जाणवली.
- प्राजु
नाव : फॉर हिअर ऑर टू गो
लेखिका : अपर्णा वेलणकर.
प्रकाशक : मेहता प्रकाशन , पुणे.
किंमत : रूपये २२५
1 प्रतिसाद:
हे पुस्तक मी वाचलंय, आणि खूपच आवडलं. अमेरिकेतल्या भारतीय, आणि खासकरून मराठी कुटुंबांचा इतिहासच त्यांनी त्यांच्या संशोधनाच्या पायावर उभा केलाय. या पुस्तकाची ओळख सगळ्यांना व्हावी म्हणून तुम्ही छान परीक्षण लिहिलंय, त्याबद्दल तुमचं ही कौतुक :)
टिप्पणी पोस्ट करा