तुझ्या प्रीतीचे देणे
राहून गेले जसे द्यायचे
तुझ्या प्रीतीचे देणे
आणिक उरले मला घातले
प्रेम फ़ुलांचे उखाणे..
कितिक हळव्या मूक क्षणांनी
मम झोळीचे भरणे
द्वैत -अद्वैताच्या झगड्यामध्ये
हृदयाचेही झुरणे..
वेचूनी सार्या प्रीत पाकळ्या
वहीत सारे जपणे
आठवणींच्या रानामध्ये
पुन्हा पुन्हा ते चुकणे..
जपूनी मोती नयनांमध्ये
मिटून पापण्या घेणे
क्षणैक हळव्या, कधीतरी ते
उगाच हुकुमी हसणे..
किती घालू मी समजूत त्याची
मन माझे हे दिवाणे
लोप पावल्या सूरांत अजूनी
शोधित राही तराणे..
2 प्रतिसाद:
कितिक हळव्या मूक क्षणांनी
मम झोळीचे भरणे
द्वैत -अद्वैताच्या झगड्यामध्ये
हृदयाचेही झुरणे..
हे कडवे वाचून मला "श्रीकृष्णाची" आठवण आली जो या द्वैत-अद्वैताच्या पलिकडे आहे, पण त्याला शोधताना, या द्वैत-अद्वैता मधे मन पार गुंतून जाते....
तर पुढचे कडवे वाचून मला माझ्याच जुन्या वह्या आठवल्या!
"वेचूनी सार्या प्रीत पाकळ्या
वहीत सारे जपणे
आठवणींच्या रानामध्ये
पुन्हा पुन्हा ते चुकणे.."
आठवणींच्या रानामध्ये
पुन्हा पुन्हा ते चुकणे.. हे म्हणजे "शब्दांच्या पलिकडले" असे काहिसे जेव्हा शब्दांत येते तशी माझी अवस्था झाली हे वाचून!
अतिशय सुंदर रचना आहे!
कविता छान आहे,हृदयस्पर्शी आहे वगैरे सर्व खरे. पण तरी ते सर्व छापील अभिप्राय झाले. एखाद्या सुंदर ठिकाणी,किंवा एखाद्या प्रदर्शनाला गेल्यावर तिथे एक अभिप्राय लिहायची वही असते. त्यात अभिप्राय लिहील्यासारखे हे आहे. कविता वाचायची नसते. ती जगायची असते. आणि हे जगणं त्या दोन शब्दातून जाणवणार नाही. कवीता वाचल्यावर मला जाणवलेली हृदयातली थरथर ही कोणला जाणवणार? कविता किंवा अभिप्राय वाचणायाला नाही. पण ती प्राजुला मात्र नक्कीच जाणवेल. कारण एक तर तिचे मन हे कवीचे मन आहे. त्यामुळे ती काविता लिहीताना तिला ती स्पंदने नक्की जाणवली असतील. आणि दुसरे म्हणजे
त्या कवितेतला भाव हा मला कसा जाणवला असेल हेही तिला, तिने मझ्याशी जोडलेल्या अनामिक अश्या वडिलांच्या नातेबंधातून समजू शकेल. आणि ते शब्दात मांडणे अवघड आहे. ताजमहालाचे एका वाक्यात वर्णन करा असे सांगितल्यावर ते शक्य आहे का?
तरीही एका वाक्यात वर्णन करा असे सांगितले तर मी या कवितेबद्दल म्हणेन : "मी ही कविता जगलोय, जगतोय."
मग बाकिच्या कडव्यांची चिरफ़ाड करण्याची गरजच नाही. माझे मत मी कवितेच्या कडव्यातूनच देतो.
"अस्वस्थ जीव मी असेन
मन माझे विद्ध अनामी
विद्ध मन-चित्तात
उसळली भाव सुनामी
या सुनामीवर मात केली
मृदू आश्वासक शब्दानी
मंद मंद शीतल अश्या
प्राजक्ताच्या शब्द गंधानी
.....पप्पा(श्रीराम पेंडसे)
टिप्पणी पोस्ट करा