छंद दे..
गर्दकाळी रात्रसारी, तेवणारा चंद्र दे
जीवघेणी ही निराशा, जीवनाला स्पंद दे..
ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
सत्य व्हावे, स्वप्नं ऐसे पाहण्या आनंद दे..
कोसळ नको भिजवणारा तापलेल्या भूमिला
चार थेंबानी खुलावा, आगळा मृदगंध दे..
बधिर झाल्या भावनांची कास का मीही धरू?
वेदनेला पेलण्याला, या उरी आक्रंद दे..
रोज जोडूनी तुटावे हे असे धागे नको
जीवनाला बांधणारा एक प्रेमबंध दे ..
मी न मीरा, मी न राधा, ना तयाची प्रेमिका
दर्शनाने मुग्ध व्हावे, तोच देवकिनंद दे..
स्तोम नाही प्रार्थनांचे, दक्षिणेची लाच ना
लीन व्हावे ज्या पुढे मी, त्या तुझा बस्स! छंद दे..
- प्राजु
1 प्रतिसाद:
keep writing . felt nice on visiting your blog .
-----rohan
टिप्पणी पोस्ट करा