सोमवार, ८ जून, २००९

आंतररष्ट्रीय सौजन्य !!

गाडी चालवणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अमेरिकेत आल्यावर गाडीशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच मी परवाना मिळवला आणि गाडी चालवायला लागले. गेलं दिड वर्ष मी कुठेही न धडपडता लोकांना सुखाने गाडी चालवू देते आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच्या तुळतुळीत रस्त्यांवरून. सांगायचा मुद्दा असा की इतके दिवस माझ्या गाडी चालवण्याबद्दल कोणीही आक्षेप घेतला नाही.. मात्र चालवून झाल्यानंतर गाडी लॉक करण्याबद्दल मात्र एका चिंक्याने (चायनीज माणसाने) सॉल्लीड आक्षेप घेतला.
सांगते ... त्याने माझ्या कार लॉक करण्यावर आक्षेप घेतला कारण सेकंदाचा १० वा भाग इतका वेळ वाजणार माझ्या गाडीचा लॉक होतानाच हॉर्न. ज्याला हाँक असं म्हणतात.

साधारण सकाळी मुलाची बस ८.३० ला येते. बाहेर वातावरण चांगलं असलं.. म्हणजे पाऊस नसला, थंडी नसली, किंवा लख्ख सूर्यप्रकाश असला आणि लेकाचं वेळेत आवरून घरातून बाहेर पडायला उशिर झाला नसला तर मी लेकाला घेऊन त्या स्कूल बसच्या पिकअप पॉईंटवर चालतच जाते. पण साधारण इथलं वातावरण असं की, आठवड्यातले २ दिवस थंडी २ दिवस पाऊस.. त्यामुळे गाडी न्यावीच लागते. अशीच एकदा गाडी पार्क केली, लॉक केली आणि लॉकिंग हाँक झाल्यावर घराकडे निघाले. तर पाठीमागून "एक्सक्युज्मी...!" अशी हाक आली. वळून पाहिलं.. तर एक चिंकी होता. माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, "यू लॉक योर कार अँण्ड इट हाँक्स विच इज इरिटेटींग फॉर मी.." मी विचारलं ,.." का?" म्हणाला, "मी दचकून जागा होतो त्या हॉर्न ने.. मला वाटतं आपण हाय वे वर आहोत आणि कोणीतरी हाँक करतं आहे.." मी म्हणाले ," पण मी मुद्दाम नाही करत, गाडी लॉक केली की हाँक होते.. मी काय करू?" मग मला म्हणाला, "रिमोटचं बटन एकदाच दाबलं की गाडी लॉक होते, दुसर्‍यांदा दाबतेस तेव्हा फक्त हाँक होते.. तू दुसर्‍यांदा बटन दाबू नको.. मला खूप त्रास होतो.. मी दचकून उठतो." मी म्हणाले, "मी प्रयत्न करेन.. " झालं! विषय संपला. ही गोष्ट मी नवर्‍याला संध्याकाळी सांगितली. तो म्हणाला, "ठीक आहे.. सोडून दे."

हे सगळं होऊन साधारण ८-१० दिवस झाले.. आणि पुन्हा एकदा चुकून माझ्याकडून लॉक करताना हाँक झालं. मी घरात येऊन साधारण ५ मिनिटे झाली आणि हा माणूस पॅटीओच्या काचेतून डोकावून आत पाहू लागला. मी दार उघडलं. नशिबाने नवरा होता घरी अजून. त्याला बघितल्या बघितल्या नवरा मराठीतून म्हणाला, "गाढवाला हकलून लावयला पाहिजे..." त्याने असं म्हणताच फस्स्कन् आलेलं हसू मी कसं बसं दाबलं. मग येऊन नवरा त्याच्याशी बोलू लागला. आपण दोघेही सभ्य आहोत याची जाणीव ठेऊन दोघेही एकमेकाशी बोलत होते. तोही हसत हसत सांगत होता "तिला २ दा बटन दाबू नको म्हणून सांग.. कारण मी एकदम दचकून जागा होतो. मला वाटतं मी हाय वे वर आहे .. आणि माझ्याकडून काहीतरी चुकलं म्हणून कोणीतरी मला हाँक करतं आहे.. माझी झोप मोड होते." नवरा म्हणाला, " फोर्ड कंपनीनेच जर आता तशी हॉकिंक सिस्टिम ठेवली आहे तर आम्ही काय करणार? आणि फक्त आमचीच कार हाँक नाही होत, इथे बर्‍याच आहेत कार्स ज्या लॉक होताना हाँक होतात.. कदाचीत दुसर्‍या एखाद्या कार मुळेही तुझी झोप मोडली असेल.. तुला आता माहितीये की आमची कार हाँक होते म्हणून तू आम्हाला सांगतो आहेस." चेहर्‍यावर अतिशय हसरे भाव ठेवत आणि अतिशय मृदू शब्दांत नवरा भांडत होता. आणि तो ही तितक्याच मृदूपणे नेहमीची हाय वे ची टेप लावत होता. हे पाहून माझी मात्र सॉल्लिड करमणूक होत होती. नवरा म्हणाला त्याला, " तू असं कर कानात कापसाचे बोळे घालून झोपत जा.." तर त्याचं उत्तर असं ," मग मला फायर अलार्म वाजला तर ऐकू येणार नाही किंवा माझ्या शेजारी झोपलेला माझा लहान मुलगा खोकला तर ऐकू येणार नाही.." त्याचं हे कारण ऐकून मात्र मला हसावं की रडावं हेच कळेना. फायर अलार्म वाजायला लागला की, अख्खी बिल्डिंग जागी होते.. असो.

सहज बोलता बोलता मैत्रीणींमध्ये हा विषय निघाला. मी सांगितल्यावर आणखी एका मैत्रीणीने तिलाही त्या माणसाचा तसाच अनुभव आल्याचे सांगितले. मग मला वाटलं, हा माणूस मनोरूग्ण असावा. त्यानंतर आणखी एका मैत्रीणिकडून समजलं की, त्या चिंक्याने चिडून तिथल्या एकाची गाडीची काच फोडली होती. का?? तर.. ती गाडी हाँक होत होती. आणि नंतर स्वतःच जाऊन ती काच दुरूस्त करून घेऊन आला होता. हे ऐकल्यावर मात्र तो मनोरूग्ण आहे यावर मी शिक्कामोर्तबच केलं. पण हे ऐकल्यापासून माझं धाबं मात्र दणाणलं. काय सांगावं चुकून रिमोट्चं बटन दोनदा दाबलं गेलं आणि हा आला आणि गाडीची मोडतोड करून गेला तर???? मी गाडी लॉक करताना आणखीनच काळजी घेऊ लागले.

आजकाल जरा वातावरण चांगलं असतं. थंडी खूपच कमी झाली आहे पावसानेही जरा उसंत घेतली आहे. त्यामुळे सकाळी मुलाला चालतच सोडायला जाते स्कूलबसच्या थांब्यापाशी. आजही मस्त चालत गेले. . बस गेल्यावर मी घरी आले. येऊन बसते न बसते तोच.. चिंकट (की चिकट??) चेहरा पॅटीओच्या काचेतून आत डोकावून पहाताना दिसला. मी उठून दार उघडलं..(अरेरे!! नवरा गेला होता ऑफिसला:( आता मलाच भांडायला हवं याच्याशी तेही थोबाडावर सौजन्य ठेऊन!!). "तू आत्ता १५ मिनिटांपूर्वी आलीस का घरी?" चिंक्या. मी म्हणाले"हो.. पण मी हाँक नाही केलं. कारण मी आज कार नेलीच नव्हती बाहेर." तो म्हणाला, "आर यू शुअर?" मी, "ऑफ्कोर्स, माझी कार बघ.. इंजिन थंड आहे. कारण काल रात्री मी पार्क केली ती अजूनही काढलेली नाही." मग ओशाळून म्हणाला,"ओह!! आय एम सॉरी.. पण मी हाँक ऐकला आणि दचकून उठलो..आणि...." मी मनात म्हंटलं,'झालं!!!! याची पुन्हा टेप सुरू झाली हायवे वाली.' मी मध्येच त्याला तोडत म्हणाले, "इथे खूप गाड्या आहेत हाँक करणार्‍या.. तुला माझी गाडी माहिती आहे म्हणून तू माझ्याकडे येतोस. तू त्यादिवशी सांगितल्यापासून मी रिमोटचं बटन फक्त एकदाच दाबते. पण मी बाकीच्या गाडीवाल्यांना नाही सांगू शकत ना .." आज माझ्याकडे हुकुमाचा एक्का होता. कारण माझी गाडी मी बाहेर नेलीच नव्हती. "यॅऽऽऽह, आय नो... तू जे करतेस त्याबद्दल तुझं खरंच खूप कौतुक आहे मला. मी खूप आभारी आहे तुझा याबद्दल.. पण मग कोण करतंय ते आता कसं कळणार? आपल्याला शोधावं लागेल." यातला 'आपल्याला' हा शब्द ऐकल्यावर माझं डोकंच सणकलं तरीही मृदू आवाजात म्हणाले, "हे बघ, मी सकाळी ६ ला उठते त्यामुळे बाहेर कोणी हॉर्न वाजवला काय, किंवा आणखी काय वाजवलं काय मला दचकायला होत नाही. त्यामुळे मला कोण हाँक करतंय हे शोधून काढायची अजिबात गरज नाहीये. तूच शोध." हे ऐकल्यावर बहुतेक त्याला त्याची बोलण्यातली चूक समजली. म्हणाला," खरंय. पण मी तुझा खूप आभारी आहे.. तू अगदी लक्षात ठेऊन हाँक करणं टाळते आहेस... तुझं खूप कौतुक वाटतं मला. मी तुझ्यासाठी काय करू शकतो.. काही मदत हवी असेल तर नक्की सांग." मनांत आलं,"घरी येणं बंद कर " असं सांगावं. पण त्याचा हा पराभूत पावित्रा बघून मी पण जरा नमतं घेत म्हणाले, "हे बघ, तू काहीही करण्याची आवश्यकता नाही. जस्ट फर्गेट इट." तो पुन्हा पुन्हा 'थँक यू व्हेरी मच' असं मच्मचंत आपलं म्हणत म्हणत निघून गेला. मी जरा निश्वास टाकला आणि चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात आले. इतक्यात आई म्हणाली, "अगं तो बघ तुझा चायनीज मित्र बहुतेक मिठाई घेऊन आलाय ." मी पाहिलं तर हातात दोन कसलीशी पॅकेट्स घेऊन हा पॅटीओच्या काचेतून आत डोकाऊन पहात होता. जरा हसूच आलं. पण जाऊन दार उघडलं. ते पॅकेट्स माझ्यासमोर धरत म्हणाला, "दिस इज फॉर यू. तू इतकं करते आहेस माझ्यासाठी.. तुला थँक्स कसं म्हणावं हे कळेना.. म्हणून हे घेऊन आलो तुझ्यासाठी. तू पोर्क खातेस का? " मी म्हणाले , "नाही. मी पोर्क खात नाही." तर पुन्हा एकदा ओशाळून म्हणाला, " ओऽऽऽह...! आय एम सॉरी!! आर यू व्हेजी टेरीयन??" मला चायनीज लोकांची व्हेजीटेरियन ची व्याख्या जरा वेगळी असते हे माहिती आहे. त्यामुळे ठसक्यात मी सांगितलं, " येस्स! प्युअरली व्हेजीटेरीयन...! नो मीट." त्याला जरा दु:ख झालं.. पण पुन्हा एकदा, "आय एम सॉरी.. आय जस्ट वाँट टू अ‍ॅप्रिशियेट यू. मला तुझ्यासाठी काहीतरी करायला आवडेल.. काही लागलं तर नक्की सांग." असं म्हणाला. मी म्हणाले, "तुला हे सगळं करायची गरज नाहीये. जस्ट रिलॅक्स. त्यातून काही मदत लागली तर मी सांगेन.." असं लवकर सुटका करून घेण्याच्या दृष्टीने म्हणाले कारण माझा चहा गॅस वर उकळत होता. तर, " दॅट वुड बी माय ऑनर..थँक्स..थँक्स अ लॉट!" असं म्हणत तो निघून गेला. आमच्या मात्र हसू हसून पोटात दुखायला लागलं. आई म्हणाली.. "तू हाँक करत नाहीस म्हणून तो तुझ्यावर फिदा झालाय..तू पोर्क खात नाहीस तर कदाचीत संध्याकाळ पर्यंत तो तुझ्यासाठी काहीतरी व्हेजीटेरियन खाऊ घेऊन येणार..!!" हे ऐकून आणिकच हसू आलं. मी नंतर मात्र बुचकळ्यात पडले. म्हणजे हा माणूस खरंच मनोरूग्ण आहे की, ओव्हर वेल मॅनर्ड आहे हेच समजेना. आभार प्रदर्शन.. हे असं??? बघू आता पुढे काय काय अनुभव येतात या चिंकट (खरंतर चिकट च) माणसाचे...!

मी भारतीय, तो चिनी आणि आम्ही राहतो अमेरिकेत. आता भारत , अमेरिका आणि चायना या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर समझोता होईल ना होईल.. पण हे आंतररष्ट्रीय सौजन्य मात्र मला अनोखं वाटलं आणि म्हणून त्याला मी शब्दबद्ध केलं!

- प्राजु

8 प्रतिसाद:

भानस म्हणाले...

हाहा...:D, प्राजू, अग हा चिंक्या ठारच वेडा दिसतोय ग बाई. सांभाळ हो. नाहीतर पुढच्या वीक मध्ये आता तू हॊंक कर मी न दचकण्याचा प्रयत्न करेन असे सांगत येईल बरं का...:)
मस्त.

Prashant म्हणाले...

मला बिचार्‍या चिनी माणसाच्या प्रयत्नांचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते. तो हॉर्नचा आवाज उगाच होउ नये म्हणून प्रयत्न करतोय. म्हणजे स्वतःशी तरी बिचारा प्रामाणिक आहे.... जे वाटतय ते सांगतोय लोकांना. लोक पर्यावरणासाठी किंवा प्राण्यांशी चांगली वागणूक करण्यासाठी ‘वेडे’ होतात. त्यालाही वाटत असेल की त्याचा हा वेडेपणा नंतर कधीतरी सगळीकडे अशी उपरती घडवेल. असो. प्रत्येकाला असे वाटण्याचा आणि तसे म्हणण्याचे स्वातंत्र्य तर आहेच.


पण या भानगडीत, त्याने तुमच्याशी पंगा घेतला याबद्दल आता त्याला खेद वाटत असेल म्हणून ते सावरण्यासाठी पाहत असेल कदाचित. तुम्ही त्याच्या या ‘कार्यात’ सामील नाही झालात म्हणून कदाचित प्रयत्नही करत असेल. पहा. आणि जरूर एखाद्या पोस्टमधे कळवा की काही केले का त्याने.


p.s.: खरोखरच जर एकच वेळा बटण दाबून काम भागत असेल आणि तुम्ही त्याच्या भितीपायी का होइना पण आता हाँक टाळण्यात तरबेज झालात म्हणून अभिनंदन.... तुमचेही आणि त्याचेही.

अनामित म्हणाले...

हिंदी चिनी भाय-भाय.. आत्ता तुझं काही खरं नाय :-)

Abhi म्हणाले...

Kamal...

Shyam म्हणाले...

काय वाचू अन काय नाही सगळेच अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!!!

Shyam म्हणाले...

प्राजू,मला हा ब्लॉग माझ्या यु.के. तील मोठा मुलगा सुन व लहान मुलगा यांना फॉरवर्ड करायचा आहे ,कसा ते कळव्शील प्लीज !

Praaju म्हणाले...

majhya blogachi link copy paste karun tyana mail kara.
khoop khoop dhanyavaad.

Dk म्हणाले...

hahaha aata pudheel velee kaathi ghe haataat ;) :D aani ek kar ekhaad gaan taak tuzya awaajaat blog var.

Page copy protected against web site content infringement by Copyscape