मन माझं..!!
अलगद दु:ख आज डसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं
रूणझुण पाऊलात रूतलेला काटा
पूर येता मनामध्ये दिसेनाशा वाटा
कुसळ का उरामध्ये सलतंय गं..
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
वठलेल्या वेलीवरी चोरून का उभं
खाली काळी माती अन शिरावरी नभ
सुकलेलं पान असं रूसतंय गं..
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
दूर दूर कोण तिथं काळोखात फ़िरे
मला पाहूनिया करी कोणते इशारे
सुख तिथे दूर उभं हसतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
भेगाळली धरा वाहे आसवांचा झरा
आभाळात नुसताच वाजतो नगारा
प्रखर उन्हांत रान भिजतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं
कधी कानी येता काही प्रेमभरे बोल
मोह पडे जीवास नि होई घालमेल
भुलव्याला रोज असं फ़सतंय गं
मन माझं खुळं मुसमुसतंय गं..
- प्राजु
2 प्रतिसाद:
Very nice poem
kavita kharokhar sanghrat ghenyasarkhi aahe
टिप्पणी पोस्ट करा