फ़ुलोरा...
केशराचा गंध ओला शोधते खुणांखुणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
चांदव्याला जाग आली की निशेला लाज आली
का उषेच्या उंबर्याशी, रे उभी ओठंगुनी ती??
चांदणे मी शिंपले रे माझिया कणांकणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
दाट झाली सावली ती, तारकांच्या सांजवाती
अमृताचे थेंब ओठी, चंदनी गंधीत राती
पाकळ्यांचे चिंब गाणे वेळूच्या बनांबनांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
वादळी आवेग सारा, तप्त श्वासांचा पसारा
मखमली ओला शहारा, धुंदला एकांत सारा
मीलनाची गंधसुमने वेचते क्षणांक्षणांतून..
आज जाईचा फ़ुलोरा दरवळे मनांमनांतून..
- प्राजु
fulora.wma |
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा