मंगळवार, १९ सप्टेंबर, २०१७

नको मना तू वळून पाहू विरून गेल्या धाग्याला

नको मना तू वळून पाहू विरून गेल्या धाग्याला
जरताराची कशास आशा उसवुन गेल्या ठिगळाला
ऐलतिरावर होती स्वप्ने पैलतीर नव्हता त्याला
कुणी कसेही नेले मग या भरकटलेल्या नात्याला
जणू मांडला किती पसारा श्वासांचा श्वासांसोबत
लय तालाची चुकली, उठून गेली स्वप्नाची पंगत
भणंगतेची बाधा कसली मनास या जडते आहे
किती धुपारे किती उतारे .. काहीच न घडते आहे
स्वप्नं मनाचे कुठे उडाले सोडुन खोपा हृदयाचा
सृजनाची आशा नुरली अन निरोप आला विलयाचा
- प्राजू

Page copy protected against web site content infringement by Copyscape