मंगळवार, ३१ डिसेंबर, २०१३

मी........... शिक्षिका!


आजकाल मी राधिका मी प्रेमिका हे आरती अंकलीकर यांचे गाणे ऐकले की मला मी.... शिक्षिका असे त्याच चालीत म्हणावेसे वाटते!

लहानपणी समोर आई -बाबा, आजी- आजोबा यांना समोर बसवून मी कधी बर्वे बाई व्ह्यायचे तर कधी सखदेव जोशी बाई. कारण या शिक्षिकांचा  लहानपणी माझ्यावर पडलेला प्रभाव इतका जबरदस्त होता की, या दोघी सोडून दुसरी कोणी शिक्षिका मी व्हावे असे कधी वाटलेच नाही. पण जसजशी मोठ्या वर्गात गेले आणि संयम नावाचा प्रकार हा शिक्षकाकडे असणे किती महत्वाचे असते हे समजू लागले. आणि मग शिक्षक होणे आपल्याच्याने होणे नाही हेही समजले.  तसं बघायला गेलं तर , माझ्या बाबांचं घराणं जसं वकिलांचं तसं माझ्या आईचं घराणं शिक्षिकांचं. म्हणजे आई, आजी, पणजी या सगळ्या शिक्षिका होत्या. त्यामुळे असेल कदाचित पण आपण चांगले शिकवू शकतो.. म्हणजेच मुलांना पर्यायाने विद्यार्थ्यांना आपण शिकवलेले कळते हे समजले जेव्हा कॉलेजच्या शेवटच्या वर्षात सेमिनार्स द्यायचे होते. मी दिलेले सेमिनार्स अपेक्षेपेक्षा बरेच चांगले झाले होते. मग कॉलेजच्या शेवट्च्या वर्षाला असताना मी अरेना मल्टिमिडिया, कोल्हापूर येथे पार्ट टाईम नोकरी सुरु केली. तिथल्या एका बॅच ला कॉम्प्युटर एडेड डिजाइनिंग शिकवायचे होते. आणि चक्क चक्क वयाने माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या विद्यार्थांना मी शिकवलेले समजू लागले. मजा यायची! पहिल्या पगाराचा चेक नाचवत बाबांना दाखवला. बाबांनी बक्षिस म्हणून माझ्या पगाराइतकीच रक्कम खिशातून ताबडतोब काढून दिली. एकदम भारी वाटलं.

त्यानंतर झी एज्युकेशन च्या झेड करियर अकॅडमी इथेही शिकवू लागले. इथे शिकायला येणारी मुले, माणसे तशी त्यांच्या प्राथमिक त्रास देण्याच्या अवस्थातून आधीच गेलेली असल्याने त्यांना हाताळताना फ़ारसा त्रास झाला नाही. मात्र आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते हे कुठेतरी कधीतरी वाचलेलं खरं आहे याचा अनुभव मुलाच्या जन्मानंतर पदोपदी येऊ लागला आणि अजूनही येतो आहे. म्हणजेच काय,  एव्हरीथिंग कम्स इन पकेज ! यामध्ये चांगल्या सोबत काही त्रास देणार्‍या, तुमचा संयम बघणार्‍या गोष्टी  सुद्धा येतात तसच काहीसं. असो.. !

अमेरिकेतल्या वास्तव्यात शनिवार रविवारची मराठी शाळा सुरु झाली. तिथल्या अमेरिकन मराठी मुलांना मुळाक्षरे (त्याला अल्फ़ाबेट्स म्हणतात) शिकवणे, मग़ बाराखडी. त्यातही चमचा आणि चिंच यातल्या 'च'चे उच्चार वेगवेगळे का? तसेच जहाज आणि जग यातल्या 'ज' चे उच्चार का भिन्न? याला कुठलेच लॉजिक नव्हते. त्यातही वय वर्षे ५ पासून वर वर्षे १५ पर्यंत वेगवेगळ्या वयाची मुले तिथे येणार!  त्यामुळे प्रत्येकाची ग्रास्पिंग लेव्हल वेगळी! लिहिण्याची गती वेगळी! त्यातही मराठी हा विषय म्हणून शिकवायचा भाषा म्हणून नव्हे! माझ्याच घरात " आई, या कॅन्डल्सवर तू फ़ायर कधी पुट करणार आहेस? " असा धेडगुजरी कारभार! लेकाला शिकवताना ८०% इन्ग्लिश आणि २०% मराठी बोलत शिकवण्याचा अनुभव कामी अला आणि तिथे मला एक चांगली शिक्षिका म्हणून लोक ओळखू लागले.

भारतात आल्यावर लेकाची इयत्ता चौथी एकदम अंगावर पडली. जिथे 'शिवाजी कोण' इथूनच सुरुवात होती तिथे एकदम शिवाजीचा इतिहास धाड्कन कोसळला आणि मोंगलांची नावे शाहिस्तेखान, अफ़जल  खान डोळ्यात पाणी आणू लागली.  त्यातल्या त्यात लेकाला बाराखडी शिकवली असल्याने मराठी हा विषय त्यातल्या त्यात ठिक होता. पण तरीही "दारी मुलाने काय सजावट केली? " या प्रश्नाला "आकाश कंदील दारीला लावला" अशी उत्तरे देऊन विभक्ती प्रत्ययांना माळ्यावर ठेवून दिले गेले. मुलाची ही अवस्था आणि त्याला शिकवताना होणारी माझी अवस्था ! कदाचित तेव्हा मला आदर्श शिक्षिकेचा पुरस्कार मिळला असता, पण मी तेव्हा फ़क्त घरीच शिक्षिका म्हणून काम करत होते. पुन्हा असो... !

जेव्हा एका नामांकित शाळेत .. सॉरी स्कूल मध्ये शिक्षिका म्हणून  काम करु लागले, तेव्हा इथल्या इंग्रजी मिडियम च्या मुलांना मराठी शिकव्ताना अमेइकेतल्या मराठी शाळेचा अनुभव १००% कामी आला असेच म्हणेन.३री ,४थी, ७वी आणी ८वी या इयत्तांना मराठी  शिकवण्याचे काम करते आहे. भारतात आल्यावर मुलाला शिकवताना काय काय त्रास झाला किंवा त्या वयातल्या मुलांची विचारसरणी कय असते हे एक आई म्हणून समजली असल्याने एक शिक्षिका म्हणून त्यावर उपाय करणे सोपे जाते आहे. खूपदा मजा मजा होते.

"वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.. " मुलांच्या दृष्टीने एक अतिशय कंटाळवाणा प्रश्न! आनंदाने बागडणे.. याचा अर्थ खूप आनंद होणे किंवा आनंदाने नाचणे. याचा जेव्हा वाक्यात उपयोग कराय्ला सांगित्ला तेव्ह, "भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर गांधीजी आनंदाने बागडले" असा वाक्यात उपयोग केल्यावर हसावे की रडावे हेच समजत नव्हते. तांत्रिक दृष्ट्या वाक्य बरोबर होते.. पण!  तसेच.. तोंडावर येणे.. म्हणजे खूप जवळ येणे.. वाक्यात उपयोग केला होता "मी आईच्या तोंडावर आलो".  पावसाळ्यातील एक दिवस हा विषय देऊन निबंध लिहायला सांगितल्यावर , "पावसाळ्यात खूप सारे गोबरगाय दिसतात" असे वाचनात आले. मग लक्षात आले या मुलाला गोगलगाय म्हणायचे आहे.  या मुलांना समजावताना नेमके कसे समजावायचे हा प्रश्न खूपदा पडतो. पण त्यातूनही मार्ग दिसतो. करमणूकही खूप होते.
चौथीला मराठी आकडे शिकवताना त्यातल्या काही मुलांना आकडे येत होते, हे लक्षात आले. घरी शिकवत असावेत. पण बर्‍याच मुलांना खास करुन अमराठी मुलांना मात्र बिल्कुल येत नव्हते. मग " टिचर, ट्वेंटि एट ला अठ्ठावीस आणि मग थर्टी एट ला अडतीस का? अठ्ठातीस का नाही? " या प्रश्नांनी आंतर्मुख व्हायला झाले. याचे उत्तर मात्र कुठेच मिळाले नाही. जेव्हा मराठीतल्या भाज्या आणि फ़ळे सुरु केले, तेव्हा.. "तुम्हाला कोणकोणत्या भाज्या खायला आवडतात?" या प्रश्नावर मलाई मेथी मटर, पनीर कोफ़्ता, व्हेज मख्खनवाला अशी उत्तरे मिळाली आणि मग आपल्याला यांच्यावर किती काम करावे लागणार आहे याची जाणिव झाली. आणि खूप मोठी जबाबदारी शिक्षिका म्हणून पार पाडायची आहे हे लक्षात आले. इथे एक गोष्ट लक्षात आली ती अशी की सगळी मुले ही त्यांच्या दुसर्‍यांना त्रास दायक होणार्‍या वयात असतानाच मी त्यांना शिकवते आहे. त्यामुळे संयम वाढला आहे हे नक्की.

रोज एक नवे आव्हान.. रोज नवे प्रश्न, रोज नवी उत्तरे! रोज एक शोधक वृत्ती की, आज नवीन काय शिकव्ता येईल. किंवा जे शिकवायचे आहे ते एखाद्या नव्या पद्ध्तीने त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल का? मराठी हा विषय म्हणून शिकण्यापेक्षा मुले भाषा म्हणून कशी शिकतील, याचा विचार! कदाचित लेखिका, कवयित्री या सोबत माझ्यातली शिक्षिका आता पूर्णपणे जागी झाली आहे याचेच हे प्रतिक आहे. एक नक्की ...शिकण्या शिकवण्यासोबत करमणूक...  हे पॅकेज सध्यातरी एन्जॉय करते आहे!

-प्राजु

2 प्रतिसाद:

D D म्हणाले...

प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
अडतीस मधला ड हा मूळच्या ठ किंवा ठ्ठ चा अपभ्रंश आहे. त्या मुलाने विचारलेली शंका बरोबर आहे आणि अडतीस हा उच्चारही आपल्या सध्याचा भाषेप्रमाणे योग्य आहे.

निखिल म्हणाले...

Good one!!

Page copy protected against web site content infringement by Copyscape