बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

ऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला

दाटले डोळे नका सांगू कुणी हासायला
ऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला?

पाहिले जे स्वप्न गेले दूर निघुनी अन अता
जायबंदी नीज येते रोज मज भेटायला

द्यायचे आहेच काही, आणखी 'तू' दु:ख दे
अन्यथा आधी शिकव 'तू' सौख्यही भोगायला

वेदना भरते सदा पाणी पहा माझ्या घरी
आणि ना थकता उभी आहे व्यथा रांधायला

मी कुठे जाहिरपणे रडले कधी तुमच्या पुढे
सांत्वना घेऊन का येता मला भेटायला?

जाणते मी बस क्षणाची साथ ही आहे 'सुखा'!
'दु:ख' तू थोडेच असशी जन्मभर नांदायला!

जीवना गणिते तुझी चुकतात सारी नेहमी?
पद्धतीने वेगळ्या तू शीक ना मांडायला

-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape