मंगळवार, २१ मे, २०१३

सूर्य म्हणतो पावसाचा शाप बघ आला फ़ळाला


बहरला मोहोर माझा, का असा पुरता जळाला
सूर्य म्हणतो पावसाचा शाप बघ आला फ़ळाला
बोलण्याचे कायदे होते जरी मी पाळलेले
नेमका कोठे कशाने तोल अर्थाचा ढळाला?
मी कशी अन काय भुलले रे तुझ्या शब्दांस पुन्हा
मानले मी प्रीत बघ फ़सव्या तुझ्या त्या मृगजळाला
हे शिखर नुसते! , नका अंदाज बांधू वेदनेचा
खूप काही साचले आहे जुने माझ्या तळाला
दाटले आकाश डोळा अंतरंगी वीज तांडव
पण तरी आव्हान देते शीड माझे वादळाला
कासवे रडली हजारो, आसवांचा पूर आला
लाडका मासा कदाचित लागला कोण्या गळाला!!
हे सुखासिन दु:ख माझे, खास दुनियेने दिलेले
वाढते त्याची नशा की, मागुनी घेते छळाला
दाखवू काही नको तू सौख्य अथवा दु:ख 'प्राजू'
सांगना सांडू नको तू पापण्यातील ओघळाला
-प्राजु

Page copy protected against web site content infringement by Copyscape