येइल श्रावण फ़िरून जेव्हा ....
लुळ्या पांगळ्या वळवागत तू नकोस वागू आयुष्या
येइल श्रावण फ़िरून जेव्हा मिळून नाचू आयुष्या
चूक -बरोबर, प्राधान्याची जाण तुला जर आहे तर
इच्छा आणि कर्तव्याला लाव तराजू आयुष्या..
नीज जरा तू, भविष्यातली स्वप्ने रंगव नवी नवी
गतकाळाला उगा आठवत नकोस जागू आयुष्या
नशिबामध्ये होते जेही तुला लाभले आहे तर
वेळ येउदे! नवखे काही नकोस मागू आयुष्या
तुझे तुझे जे आहे त्याचे सोने कर तू सवडीने
तुझे न जेही त्याच्यापाठी नकोस धावू आयुष्या
जीवन आणिक मृत्यू मधले एका श्वासाचे अंतर
कधीतरी त्या पार जायचे,.. मिळून जाऊ आयुष्या
अशीच सोबत करशील ना तू जन्मजन्मांतरी मला?
शरण येउनी तुला विचारी, वेडी 'प्राजू' आयुष्या
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा