कहाणी जुनी..
दिशातून खाली हळू सांज आली
लपेटून कायेवरी तारका
जणू विश्व कवटाळताना उराशी
दिसे सूर्य का पेटल्या सारखा
हळूवार पदरास सैलावले अन
तिने सोडले त्यास क्षितिजावरी
तिचे रूप पाहुनिया भास्कराने
किती सांडले रंग अस्तावरी
घडी मिलनाची सुरू तेथ झाली
फ़ुलांनीच वाती जणू लावल्या
दिशातून गंधाळलेला पसारा
सवे घेउनी दाटल्या सावल्या
नसे भास्कराला अता भान काही
हरवला तिच्या धुंद वळणातुनी
किती माळल्या चांदण्या विस्कटूनी
तिच्या मोकळ्या दाट केसातुनी
तिला रोमरोमातुनी चेतवूनी
तिचे रूप अवघे परिणीत झाले
तिच्या अंतरी तेज रोवून त्याने
उद्याच्या उषेचेच भाकीत केले
अनंतात चाले असा खेळ अवघा
असो वा नसो साक्ष देण्या कुणी
दिवस जन्म घेतो फ़िरूनी नव्याने
जरी रोज वाटे कहाणी जुनी..
-प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा