घालमेल..
रात्र आता पुन्हा नव्याने स्वप्न तुझे मग दाखवेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..
सावळा प्रकाश भरून राहिल,दाही दिशांत वाहून जाईल
कोवळी झुळुक वार्याचीही तरूवेलींना हसवून जाईल
ओंजळीतून निशेच्या मग चांदण-चुरा नभात पसरेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..
खिडकीमध्ये हळूच आता,मंद सुगंध डोकावतो
हृदयामध्ये उसळणार्या लाटांसही धुंदावतो
उगाच रातराणी माझ्या मनीमानसी बहरेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..
सुरू होईल पुन्हा पुन्हा मग,विविध छटांची स्वप्नमालिका
श्याम तू, नि तुझी मी राधा,तुझ्या ओठीची कधी सानिका
डोळ्यांवरती स्वप्न दुलई, रात्र आता पांघरेल
पुन्हा नव्याने होईल माझ्या वेड्या मनाची घालमेल..
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा