आई ते लेखिका!!
७ वर्षांची होते मी, तिसरीत होते. प्राथमिक शाळेत वक्तृत्व स्पर्धा होत्या. फक्त दोन मिनिटांचं भाषण करायचं होतं. कधीही वाटलं नव्हतं की मला त्या वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस वगैरे मिळेल! माझ्या आठवणीप्रमाणे ते माझं भाषण आईने लिहून दिलेलं पहिलं लिखित होतं. त्या आधी म्हणजे तिच्या कॉलेजच्या दिवसांत तिने बर्याच स्पर्धा गाजविल्या होत्या हे कालांतरानं समजलं. पण आपली आई खूप छान लिहिते हे समजायला मला तिसरीत जावं लागलं.
माध्यमिक शाळेत गेल्यावर तर अखंड वक्तृत्व स्पर्धा गाजविल्या मी. साहजिकच, भाषण आई लिहून देत असे. तेव्हा आई केवळ सौ. मंजुश्री गोखले होती. काही घरगुती कारणांमुळे, तिला इचलकरंजीतल्या 'दि मॉडर्न हायस्कूल' या इंग्लिश मिडियम शाळेत, बालवाडीच्या वर्गाला शिकवण्यासाठी नोकरी पत्करावी लागली. तिच्याकडे असलेल्या शिकवण्याच्या हातोटीमुळे, दुसर्याच वर्षी तिला माध्यमिक वर्गावर घेतले गेले. आणि मग आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्याना मराठी-हिंदी ती शिकवू लागली. जसजसे वक्तृत्व स्पर्धेत माझे नाव दिसू लागले, तसतसे, मॉडर्न हायस्कूलच्या मुला-मुलींचेही दिसू लागले. नाटक-नाट्यवाचन यातूनही मॉडर्न हायस्कूलची मुलं बक्षिस घेताना दिसू लागली. गोखले टीचर हे नाव संपूर्ण शालेय जगतात झपाट्याने पसरत गेलं. स्पर्धांमधून माझ्या भाषणातील मजकूर जास्त चांगला की, मॉडर्न हायस्कूलच्या वक्त्याच्या भाषणातील मजकूर चांगला हे ठरवणं कठीण होऊ लागलं. कारण त्या भाषणांची लेखिका सौ. मंजुश्री गोखले हीच असायची.
एकदा जिल्हास्तरीय एकांकिका स्पर्धा होत्या, आणि त्यातल्या एका एकांकिकेला उत्कृष्ठ एकांकिका, उत्कृष्ठ लेखन, उत्कृष्ठ दिग्दर्शन आणि उत्कृष्ठ सादरीकरण अशी इतकी सगळी बक्षिसं मिळाली. ती एकांकिका होती "ओम मित्राय नम:" आणि त्याची लेखिका, दिग्दर्शिका होती गोखले टीचर. मॉडर्न हायस्कूल पुन्हा शालेय जगतात अभिमाननं मिरवू लागलं. आईसाठी झिंग आणणारे दिवस होते ते! एक लेखिका म्हणून आईने लिहिलेलं हे पहिलं वहिलं नाटक, हेच तिचं पहिलं वहिलं प्रकाशनही आहे. मॉडर्नला असतानाच तिने एम. ए. केलं. रोजच्या जबाबदार्या, आमच्या शाळा, बाबांचं ऑफिस, तिची स्वत:ची शाळा, तिचे शाळेतले तास सगळं सांभाळून, रात्र रात्र जागून तिने अभ्यास केलेला मी पाहिला आहे. एम. ए. फर्स्ट क्लास पास झाल्यानंतर पुन्हा तसंच बी. एड. केलं. बी. एड. ला असतानाच 'संत तुकाराम' हा विषय तिला अभ्यासाला होता. आणि 'आवली'ची ठिणगी इथंच पडली होती. आई म्हणते, "मला मानसिक बळ देण्यात मॉडर्न हायस्कूलचा खूप मोठा हात आहे. मॉडर्नने मला खूप आधार दिलाय. तिथल्या मुलांनी दिलेलं प्रेम, मुख्याध्यापकांनी दाखवलेला विश्वास आणि सह शिक्षकांनी केलेलं सहकार्य..कशाचंच ऋण मी नाही फेडू शकणार....."
बाबांची बदली झाली, आणि आमचं बाडबिस्तार गुंडाळून कोल्हापूरला आलं. पहिले काही दिवस, सर्व स्थिरस्थावर होईपर्यंत आई घरीच होती. पण म्हणतात ना, की मोगर्याचं फूल झाकून ठेवलं तरी दरवळ पसरतच राहतो! पुढारी, सकाळ, लोकसत्ता सारख्या दैनिकांतून, वेगवेगळ्या विषयांवर तिचे लेख येऊ लागले. त्या लेखांवर, वाचकांच्या प्रतिक्रियांमधून तिचं कौतुक होऊ लागलं. कोल्हापूरच्या 'कैलासगडची स्वारी' मंदिरात, वेगवेगळ्या सभांमधून, तिला व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केलं जाऊ लागलं. महाराष्ट्र पोलिसदलाच्या एका कार्यक्रमासाठी, सूत्रसंचालिका म्हणून, तिला आमंत्रित केलं गेलं. सुप्रसिद्ध भावगीत गायक श्री. अरूण दाते, यांच्या शुक्रतारा या कार्यक्रमासाठी, सूत्रसंचालिका म्हणून, तिने कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, बेळगांव, कराड, सातारा या भागांत दौरे केले. दरम्यान आईने एका महाविद्यालयात अर्धवेळ शिक्षिकेची नोकरी धरली, आणि गोखले टीचर प्रा. सौ. मंजुश्री गोखले झाल्या. काही कारणाने, ती नोकरी सोडून देऊन, तिने एका बी.एड. महाविद्यालयात मुख्याध्यपिकेची नोकरी पत्करली, पण आता, कोल्हापूरसारख्या शहरात व्याख्याती म्हणून, निवेदिका म्हणून नावारूपाला येत असलेल्या आईला ९-६ बंधनात राहणं जमत नव्हतं. हळूहळू तिचा कल जास्तीत जास्त निवेदनाकडें, लेखनाकडं वळू लागला. यथावकाश एक कविता संग्रह प्रकाशित झाला, 'शिशिरसांज'. चैतन्य प्रकाशनच्या संजय भगत आणि मेघनाथ भगत यांनी, आईची बरीच पुस्तकं त्यांनंतर प्रकाशित केली. पैकी, 'शालेय भाषणे', 'शालेय उपक्रम', 'अ ब क ड ई' ही शालेय एकांकीका,' फुलपाखरांचा गाव', 'आकृतीबंध' हे चारोळी संग्रह, 'रान गंध' हा कविता संग्रह, 'स्वस्तिकाची फुले' हा कथा संग्रह. हे सगळे प्रकाशन सोहळे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेत. ..
संपूर्णपणे तिनं स्वत:ला लेखनामध्ये आणि निवेदनामध्ये गुंतवून घेतलं. इचलकरंजीत असताना तिला स्पॉन्डीलायटिसचा खूप त्रास होत होता. इतका की, तिला शाळेच्या मस्टरवर सही सुद्धा करता येत नव्हती. होमिओपथिक औषधे आणि प्रचंड इच्छाशक्ती, यांच्या बळावर तिने आजपर्यंतचे लिखाण सुरू ठेवले. दरम्यान माझं लग्न झालं. आता तर तिनं पूर्णपणे लेखनावर भर दिला होता. किती नाटकं लिहिली! किती कविता लिहिल्या! दैनिकांमधून किती लेख लिहिले! त्याला मोजदादच नाही. या बाईला एकेकाळी साधी सही करताना सुद्धा त्रास होत होता, असं कोणाला सांगितलं तर खोटं वाटेल इतकं तिनं लिहिलं.... पुढारी, सकाळ सारख्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमधे गोखले मॅडम कडून लेख आला आहे हे समजलं तर संपादक मंडळ तो तपासून बघण्याचाही त्रास घेत नाहीत! सरळ टंकलेखनासाठी जातो! माझ्या लग्नानंतर एक मात्र झालं की, मी तिच्या लेखांची, कवितांची पहिली वाचक-श्रोती असायाचे, ते मात्र आता होता येईना... तरीही फोनवरून ती मला ऐकवायची. मायलेकी असलो, तरीही तिची मुलगी म्हणून तिनं मला कधीही वाचायला दिलं नाही, तर साहित्याची आवड असणारी एक वाचक, म्हणून तिनं मला वाचायला दिलं, आणि तेव्हा मी तिची ती अपेक्षा पूर्ण करू शकले, याचा मला आज अभिमान वाटतो!
एक प्रसंग मला आठवतो, मी नववीत होते, तेव्हा मला आमच्या शाळेतून सांगली आकाशवाणी केंद्रावर बालसभा कार्यक्रमासाठी बोलावणं आलं होतं. विषय होता, "माझे मनोगत". तयारीसाठी दोन आठवड्यांचा कालावधी होता. आईनेच नेहमी प्रमाणे भाषण लिहून दिलं. त्यातली एक छोटी गोष्ट सांगते... आपले आई-बाबा, आपल्या ताई-दादाचं सगळं ऐकतात आणि आपण लहान, म्हणून आपल्याला फक्त अभ्यास कर, जेवण सगळं संपव अशी सक्ती करतात.... अशा संदर्भात त्यात एक वाक्य होतं, ज्यात ती मुलगी म्हणते "आई, हा टॉप या स्कर्टवर मॅचिंग होत नाहीये." तर यावर "आतापासून कशाला हवंय मॅचिंग ?? चल जा त्या दोन कपबश्या विसळून टाक आणि अभ्यासाला बैस." असं तिची आई तिला म्हणते. मी ते वाचत असताना मला ते खटकलं, आणि मी आईला सांगितलं की "यात कपबश्या विसळण्याचा उल्लेख नकोय, तो थोडासा सावत्रपणाकडे झुकणारा वाटतो आहे." मला कितपत कळलं होतं हे देवच जाणे, पण आईने तो उल्लेख लगेचच काढून टाकला! स्वतः एक मोठी लेखिका असतानाही, आपल्या लेकीने सुचवलेला बदल तिने झटकन मान्य केला. माझ्यातील कल्पनाशक्तीला, भावी लेखिका म्हणुन माझ्यातल्या प्रतिभेला खतपाणी घालण्याचा हा तिचा प्रयत्न असेल काय ?
संपूर्ण कोल्हापूरच्या सांस्कृतिक जगतात आईचं नाव गाजत होतं! संगीतकार आसिफ़ बारगीर यांच्या सोबत तिने "झिंग्र्या आणि झंपी" हा बालगीतांचा अल्बम केला. यातली गाणी आईने लिहिली होती. अनेक शाळांतून तो अतिशय लोकप्रिय झाला. अशातच तिला "सांग प्रिये तू कुणाची?" हा चित्रपट मिळाला. या चित्रपटातली गीते आईने लिहिली. आणखी एक बालचित्रपट आणि मराठीतला पहिला अॅनिमेशनपट "मिंगो" तिने केला. या चित्रपटाची कथा, गाणी, पटकथा आईची होती. या चित्रपटाचे श्रेय तिने केलेल्या मेहनतीच्या आणि तिच्या योग्यतेच्या फारच कमी प्रमाणात तिला मिळाले. अर्थातच चित्रपटसृष्टीत नवीन असल्यामुळे, तिने तेही पचवले. यानंतर मात्र अलका कुबल अभिनित, "सासूची माया" तिने केला आणि मंजुश्री गोखले हे नाव सगळ्यांना समजले. ई-टीव्ही ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर चालू असलेल्या "सिद्धी विनायकाचा महिमा" या मालिकेच्या काही भागांचे लेखन तिने केले आहे. आणखी एक म्हणजे कोल्हापूरमध्ये स्थानिक वाहिनी वर सुरू असलेल्या "सौभाग्याची शपथ" या मालिकेचं लेखन तिनं केलं आहे. कथा, पटकथा, संवाद सगळंच तिचं आहे यात.
तिची आत्तापर्यंत प्रकाशित झालेली पुस्तके म्हणजे,
१.एकांकिका चार: १. अ ब क ड ई २. ॐ मित्राय नम: ३. सत्यम शिवम सुंदरम ४. आणि सदाफुली रंगीत झाली.
२. कविता संग्रह: १. शिशिरसांज २. रानगंध ३. फुलपाखरांचा गाव ४. आकृतीगंध.
३. कथा संग्रह: १. हास्यमेव जयते २. ओंजळीतले मोती ३. चिन्ना- साहस कथा संग्रह ४. स्वस्तिकाची फुले ५. विनोदी कथा संग्रह- बुफे आणि फेफे.
४. धार्मिक पुस्तके: १. कैलास गडची स्वारी अमृत संदेश आणि महात्म्य.
५. कादंबर्या: १. अग्नी लाघव २. अंधाराच्या सावल्या आणि ३. तुकयाची आवली (ह्या कादंबरीला दोन पुरस्कार मिळाले, आणि त्यापेक्षाही महत्वाचं, म्हणजे प्रत्यक्ष राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्याकडून कौतुकाचं मानपत्र मिळालं)
आवली बद्दल सांगताना आई म्हणते, "मला एम.ए. करत असताना, 'संत तुकाराम' हा एक विषय होता. त्यामध्ये संत तुकारामांचं चरित्र संपूर्ण अभ्यासताना, साधकापासून-सिद्धावस्थेपर्यंत तुकारामांच्यात होणा-या बदलाची, त्यांच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट क्षणांची भागीदार आणि साक्षीदार असलेली आवली. तिचा कजाग, भांडखोर, कर्कशा असा उल्लेल्ख नेहमी आढळला. पण ती आवली अशी का झाली, हा विचार कोणीच केला नाही. ना तुकाराम महाराजांनी, ना इतिहासकारांनी, ना अभ्यासकांनी, ना साहित्यिकांनी आणि आवली उपेक्षितच राहिली कायमची. तुकाराम महाराजांसारख्या वटवृक्षाची, एक चिवट, कणखर, मजबूत अशी मुळी बनून, आवली कायम जमिनीतच राहिली; नव्हे, ती जमीनच बनून राहिली, ऊर फाटलेली, भेगाळलेली, जखमी जमीन. त्या पूर्णपणे आंधारातच राहिलेल्या आवलीला, तिच्यातील घायाळ, जखमी, विद्ध आईला, पतीवर नि:स्सीम प्रेम असूनही, त्याने दुर्लक्ष केल्यामुळे संसाराचा गाडा एकहाती ओढणा-या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी मी हा सगळा खटाटोप केला."
लेखिकेचा हा खटाटोप नक्कीच वाया नाही गेला असं आता विचार करताना वाटतं. मेहता पब्लिशिंगकडे सध्या तिची संत चोखामेळांवर असलेली "जोहार माय बाप जोहार" ही कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. आणि "ओंकाराची रेख जना" ही संत जनाबाई वरची एक कादंबरी लिहून पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
आईला रागावताना पाहिलंय..प्रेमाने जवळ घेतना पाहिलंय..माझ्या यशाने आनंदीत झालेलं पाहिलंय.. माझ्या आजारात रात्रंदिवस सगळं काम सोडून उशाशी बसलेलं पाहिलंय..माझे सगळे सण स्वत: हिरीरीने साजरे करताना पाहिलंय..सुनेचं बाळंतपण तिचीसुद्धा आई होऊन करताना पाहिलंय..माझ्या मुलाला ताप आला तर माझ्या शेजारी बसून माझ्या बरोबरीने रात्र जागवताना पाहिलंय..पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी नेहमी कोणती साडी नेसू म्हणून गोंधळात पडलेलं पाहिलंय..चित्रपटाचं श्रेय हवं तितकं न मिळाल्याने "फसवणूक झाली " म्हणून थोडं दु:खी झालेलं पाहिलंय..माझा एखादा लेख, एखादी कविता आवडली तर कौतुकभरल्या नजरेने माझ्याकडे पाहताना पाहिलंय..अणि असं माझ्याकडे पहात असताना "आपण योग्य पेरलं आहे" याचं समाधान तिच्या चेहर्यावर पाहिलंय. मात्र, "मला जमेल का?" असा विचार करत बसलेली आई मला आठवत नाही. "जमेलच!!!!" म्हणून स्वत:ला झोकून देऊन काम करणारी आई आहे माझी. हेच पहात मी आणि माझा भाऊ मोठे झालो. संस्कार, संस्कार म्हणतात ते करण्याची वेगळी गरज असते का? की स्वत:च्या वागण्यातून ते घडत असतात? माझी आई देवाधर्मात कधीच रमली नाही..कधी कोणत्या आहेराच्या देवाण-घेवाणीत रमली नाही..कर्तव्यात चुकली नाहीच, पण कधी ती पूर्णवेळ गृहिणीही झाली नाही. कौटुंबिक चढ-उतार भरपूर आले..ज्याची मी साक्षीदार आहे..पण तिने कोणालाच आणि कशालाच दाद दिली नाही. माझ्या आईचा मलाच काय, पण अख्ख्या कोल्हापूरला अभिमान आहे.
देवाने आईला निर्माण करताना, स्वत:चा आ- म्हणजे आत्मा आणि स्वत:चे अस्तित्व म्हणजे ई- ईश्वर यांची सांगड घालून, मोठ्या विश्वासाने आईच्या हातात या जगाची सूत्रे दिली. म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हणतात. अशा आईच्या पोटी जन्म दिल्याबद्दल मी देवाचे आभार मानू की आईचेच?
इथून पुढचे जितके म्हणून जन्म असतील ते मला याच आईच्या पोटी मिळावेत..आणखी काय मागू मी ??
- प्राजु
8 प्रतिसाद:
छान झाला आहे लेख...
एकाच वेळी तुमच्या आईतील आई आणि लेखिका या दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना सुंदर व्यक्त केलं आहे !!!
सतीशशी सहमत. त्यांच्या लेखनाचे ऑनलाइन दुवे असतील तर ते देण्याची कृपा करावी :)
आपल्या ब्लॉगला ही पहिलीच भेट. त्यामुळे आपण मंजुश्री गोखले यांच्या कन्या हे माहित नव्हतं. लेख आवडला.
बेळगाव परिसरात होणार्या पाच सात साहित्य संमेलनातून आमची ‘अक्षरधन वाचन संस्कृती चळवळ’ (संस्कारक्षम पुस्तके, अल्प दरात, घराघरात..!) ही संस्था अल्प दरात पुस्तके विकते. अनिल मेहतांकडून या पुस्तकाची शिफारस झाली होती. गेल्या वर्षी या पुस्तकाच्या शंभरेक प्रती आम्ही विकल्या. लोकांना पुस्तक आवडले. मला हे पुस्तक विशेष आवडले.
सुंदर! लेख काळजाला भिडला! खूप जिव्हाळ्याने लिहिलाय.
Khupacha mast lihile aahes. Faracha surekah zala aahe lekha.
very nice
nishabd
खूप छान प्राजू !! जिवंत पणाची धार तुझ्या लिखाणात नेहमीच असते ....पण आज आई वर लिहिताना तुझ्यातील जी मुलगी आहे ना ती मस्तच !!
टिप्पणी पोस्ट करा