वर्षाव अमृताचा..
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी
श्वासात खोल जाई मिसळून रातराणी..
बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे
क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी..
उठती अनेक हलके हलके तरंग कोठे
गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी..
अल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा
लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी..
हळुवार मंद होई हा दीप तेवणारा
वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी..
वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे
उजळून जात काया, लावण्य हे नुराणी..
घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे
दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी..
हकलेच गूज सांगे ती रात्र पांगताना
बेधुंद मीलनाची अन ठेवते निशाणी..
वर्षाव अमृताचा .. मी त्यात चिंब व्हावे
लाजून चूर व्हावे , स्मरताच ही कहाणी..
- प्राजु
2 प्रतिसाद:
sundar..
थोर शब्द प्रभु आहात आपण एक अपूर्व, अप्रतिम शब्दा नुभव!( शब्दांच्या पलिकडे नेणारा.!
टिप्पणी पोस्ट करा