ठेवणीतले आवाज ..
नमस्कार मंडळी,
आवाज हा शद्ब इतक्या अर्थी आपण वापरतो की आपल्यालाच त्याची कल्पना येत नाही. साधारणपणे "त्याचा आवाज चांगला आहे" असं कोणी म्हंटलं तर नक्कि तो चांगला गात असावा असंच वाटतं. आवाजात चढउतार सुरेख आहेत असं कोणी म्हंटलं तर नक्की समजतं की, निवेदकाचा / नाटककाराचा/ नटाचा आवाज आहे . चिरका आहे आवाज असं म्हंटलं तर समजतं की, कानाला त्रास होणारा किंवा पिचत जाणारा आवाज आहे. खणखणीत आहे आवाज .. असं म्हंटलं की समजतं की नक्की एखाद्या वक्त्याचा, पुढार्याचा आवाज आहे. जर म्हंटलं की, मंजुळ आहे आवाज तर फक्त आणि फक्त समोर एखादी नाजूकशी मुलगी येते. कोणा मुलाचा आवाज मंजुळ असल्याचा ऐकिवात नाही. भसाडा आहे आवाज असं म्हंटलं तर एखादा बोजड मनुष्य डोळ्यासमोर येतो. आवाजाला विशेषणं तरी किती लावावीत! कित्येक प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो.. जेव्हा कोणताही आवाज नसतो तेव्हा पोकळीचा आवाज आपल्याला ऐकू येतो.. म्हणजे आपल्याला जाणवतो.
रोजच्या जीवनात, घरातले आवाज, धुण्याचे, भांड्याचे, फ्रिजचे, वॉशिंग मशिनचे, गॅस पेटवल्याचे, चहा , दूध उतू गेल्याचे, रेडीओचे, बिल्डिंगच्या लिफ्टचे, जीन्यावरून जाणार्या पावलांचे... अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरात, बाहेर, सगळीकडे आपण वेगवेगळ्या आवाजांनी वेढलेलो असतो. आवाजाशिवाय दुनिया असूच शकत नाही.सकाळी दूध वाला घंटी वाजवतो तिथेपासून सुरू झालेले आवाज, ते आपल्या नवरा/बायकोचे घोरणे ऐकून संपातात. वाहनांचे आवाज, हॉर्न, ब्रेक खडखड.... इ. विषयी न बोलणंच बरं. कारण इथे मग साऊंड पोल्युशन वाले जोरदार वाद घालतात. तेव्हा तेरीभी चूप मेरी भी चूप.. हेच बरं.
हृदयाची धडधड.. अतिशय महत्वाची. हा आवाज जर थांबला तर जीवन थांबलं. श्वासांचे आवाज.. तितकेच महत्वाचे. नाही का?जे काही नैसर्गिक आवाज आहेत.... म्हणजे झर्याचं खळाळणं, वार्याचं घोंघावणं, झाडांची सळसळ, पक्ष्यांचा किलबिलाट, प्राण्यांचं ओरडणं, कोकीळेचं कूजन, विजेचं कडाडणं, ढगांचा गडगडाट्,पावसाची रिपरिप, नागाचा फुत्कार.... यांचा एकप्रकारे मानवी मनावर इतका जबरदस्त प्रभाव आहे की, त्या त्या आवाजांना आपण ती ती विशेषणंच लावतो. कधी ऐकलं आहे कोणी म्हंटलेलं, " व्वा! काय पावसाचा किलबिलाट चालू आहे!" किंवा " तुमचा कुत्रा किती फुत्कारतो आहे?" .... नाही ना! म्हणजेच आवाज या एकाच शब्दामध्ये इतके प्रचंड अर्थ दडलेले आहेत.
आता ठेवणीतले आवाज.. असं म्हंटलं की काय येईल डोळ्यासमोर?? एकदा कॉलेजमध्ये माझी एका मुलीशी ओळख झाली. तिच्या आवाज इतका विचित्र होता.. पण नंतर थोडे दिवसांनी कॉलेजच्या कोणत्याशा कार्यक्रमात तिला गाताना पाहिलं आणि ऐकलंही. तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. तिला सांगितलं मी, "बाई गं, तुझा ठेवणीतला आवाज इतका सुंदर असेल असं वाटलं नव्हतं". तर असा हा ठेवणीतला आवाज. माझा धाकटा भाऊ,"तायडे, मायडे"... असं सोडून.. "ए ताई गं...." अशी हाक मारून ठेवणीतला आवाज काढून बोलू लागला की, समजायचं साहेबांना नक्की स्कूटी हवी आहे, किंवा कॉलेजची वर्कशीट पूर्ण करायला मदत हवी आहे. "बॉबॉ... " अशी माझ्याकडून हाक गेली की, बाबा समजायचे नक्की काहीतरी हवं आहे. घरातल्या घरातच आपण कितीतरी ठेवणीतले आवाज ऐकतो."अहोऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ!" किंवा "अरे ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ए!' अशा ऐवजी ठेवणीतला आवाज काढून बायको हाक मारते म्हंटलं की, नवरा लगेच आपलं पैशाचं पाकिट चपापतो.. आणि त्यात किती पैसे आहेत त्यावर तिला नक्की कोणत्या आवाजात "ओ" द्यायची हे ठरवतो. किंवा आता माझ्या नवर्यासारखा माणूस नक्कीच विचार करत असेल की, आता नक्की कोणता पदार्थ (होनोलूलूयन, तिबेटियन... मेक्सिकन्...वगैरे) टेस्ट करायला ही सांगणार आहे??...हे झालं नवरा बायको बद्दल. सासू-सून.. यांच्या ठेवणीत बर्याच प्रकारचे आवाज असतात. भांडताना काढायचा वेगळा आवाज, मिळून काम करताना वापरायचा वेगळा आवाज, इतर लोकांसमोर प्रेमाने वापरायचा वेगळा आवाज, टोमणे मारताना वेगळा आवाज. सासू असेल तर मुलासमोर सूनेशी बोलतानाच वेगळा (थोडा गरीब) आवाज, सूनेचेही तसेच नवर्यासमोर सासूशी बोलताना (अगदी आज्ञाधारक) आवाज.. .. हे झाले घरातले ठेवणीतले आवाज.पण खरे ठेवणीतले आवाज ऐकायचे तर घराबाहेर. म्हणजे फेरीवाले, भाजी वाले.. यांचे. पुण्यात आमच्या सोसायटीत रोज दुपारी साधारण १ ते दीड वाजता "............अंडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य" असा आवाज यायचा. मला वाटायचे हा माणूस रोज रोज अंडी विकायला येतो की काय! आणि अशी काय लोकं त्याच्याकडून अंडी घेतात म्हणून हा इतक्या जोरात ओरडतो? एकेदिवशी संध्याकाळी ब्रेड ऑम्लेट करावे असे ठरले. म्हंटलं दुपारी अंडीवाला आला की त्याच्याकडूनच अंडी घ्यावी. बरोबर १.३० वाजता नेहमीची हाक आली, ".........अंडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य." जीना उतरून खाली गेले.. आणि त्याला पाहून हसावे का रडावे हेच कळेना. कारण तो अंडीवाला नसून बोहारी होता आणि "भांडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ य' असे तो ओरडत होता. त्याचं नावही भारी होतं..'गुलाबभाई कपबशीवाला.."!
एक आणखी एक मटकी मावशी यायची सोसायटीत. ती मोडाची कडधान्ये, सोबत टॉमेटो, कोथिंबीर, मिरच्या अशा बेसिक भाज्या विकायची. ती आजूबाजूच्या सोसायटीत आली की,.."....ट्की ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" अशी हाक ऐकायला यायची. आणि मग जसजसे "...टकी"... मग "... मटकी ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" असे पूर्ण ऐकायला यायचे तेव्हा समजायचे की बाई आता आपल्या बिल्डींग मध्ये आली आहे. एकदा कोल्हापूरात कपिलतिर्थ मंडई मध्ये गेले होते. तेव्हा.. एका माणसाची गंमत वाटली. " आल्ले आल्ले आल्ले.... टॉमॅट्टो(ट्टो वर जोर देऊन) आले, फिलावर(वर वर जोर देऊन) आले, काक्कड्डी आले (त्याच टोन मध्ये), ताजी भेंडी आले... आल्ले आल्ले आल्ले..." असा ओरडत होता. आधी नुसतंच आल्ले आल्ले आल्ले हे ऐकून वाटलं हा माणूस आलं विकतो आहे.. मग पुढचे ऐकल्यावर समजलं की तो आलं सोडून बाकिच्या भाज्या विकतो आहे.
आमच्या कडे रोज सकाळी सकाळी खर्जातला आवाज काढून (आल्ला के नाम पे दे दे बाबा प्रकारचा आवाज) "केदाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ र्र" ... असं कोणीतरी ओरडत यायचं. खूप दिवस ऐकल्यावर एकदा कुतुहल म्हणून पाहिलं तर तो रद्दिवाला होता आणि तो ठेवणीतल्या आवाजात "पेप्पॉर" असा ओरडत होता. एकदा मुंबईतल्या डोंबिवली या उपनगरात मामाकडे रहायला गेले होते. तेव्हा तिथे रोज दुपारी ४ च्या दरम्यान .."नीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ट चाला" असं कोणीतरी ओरडताना ऐकू यायचं. २-३ वेळा ऐकल्यावर हा नक्की काय विकत असेल याचा अंदाज बांधायला सुरूवात केली. पण काही कळेना. शेवटी ४ च्या दरम्यान बाल्कनीत उभी राहीले.. तो आलाच... लांबून आवाज आला "नी ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ट चाला". पण तो अजून नजरेच्या टप्प्यात नव्हता. शेवटी तो दिसला आणि त्याच्याकडे असलेले खडे मीठ दिसले. तो ओरडत होता..."मीऽऽऽऽऽठ वालाऽऽऽऽ"तासगांवला आजी-आजोबांकडे गेले की, तिथेही दुपारी एकजण यायचा. त्याचं ओरडणं सजमायचं. तो काय विकतो आहे ते ही समजत होतं. कारण ठेवणीतला असला तरी त्याचा आवाज, शब्द नीट समजण्या इतका स्पष्ट होता. त्याची ओरडण्याची पण एक स्टाईल होती.. "उंदीर मारतंय, घुश्शी मारतंय ऽऽऽऽऽ डोसकीतल्या व्वा मारतंय" असं तो ओरडायचा. कोणतंतरी उंदीर मारायचं देशी औषध तो विकायचा. तासगावला आणखी एकजण यायचा.."घेट्ला घेट्ला.. घेटला.. लाल घेतला, पिव्ळा घेतला, पांढरा घेतला.... गोड घेतला" असं तो ओरडायचा. तो आईस्क्रिमचे गोळे विकायचा ...ते काठीला लावलेले असतात तसले.
सगळ्यांत गमतीदार आवाज असतात ते भंगार वाल्यांचे. आजपर्यंत एकही भंगारवाला असा नाही पाहिला किंवा ऐकला की ज्याचं ओरडणं निट समजलं आहे. "पत्रा, बाटली, लोखंड.. किंवा डब्ब्बा .. बाटली, लोखंड, प्लाश्टीकऽऽऽऽऽऽऽऽऽऽ" ओरडताना शब्द हेच पण प्रत्येकाचे ठेवणीतले आवाज वेगळे. बरं.. या लोकांशी तुम्ही त्याच्यापाशी जाऊन बोलू लागलात तर वेगळेच आवाज असतात. ते तुमच्याशी बोलताना साध्या आवाजात बोलतात. पण ओरडताना मात्र खास कमावलेले, कल्चर केलेले आवाज वापरतात.सांगलीत आमच्या बिल्डींग मध्ये शनिवार रविवार सकाळच्या वेळेत एक माणूस यायचा.. इडली चटणी, सँडवीच, समोसे, बटाटेवडे असले प्रकार विकायचा. तो जो आवाज काढायचा त्यातलं फक्त शेवटचं ....'स्सम्मोस्से ऽऽऽऽऽ य" इतकंच कळायचं.
एकदा एक फेरिवाला अगदी मनापासून ठ्वेणीतल्या आवाजात ओरडत होता.."स्वच्छ करून देनार्ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ पाव किलो घ्या, १ किलो घ्या.. २ किलो घ्या.." हे ऐकून काही समजलं नाही. कारण तिथे काही जणांकडे त्यांचे बाथरूम संडास धुण्यासाठी माणूस येत असे. आधी वाटले असाच कोणी फिरतो आहे वाटतं. स्वच्छ करून देनार.... पण मग १ किलो.. २ किलो.. हा काय प्रकार आहे म्हणून बाहेर जाऊन पाहिले, तर तो एक शेतकरी होता आणि शेतातला फक्त फ्लॉवर विकत होता. आणि तो फ्लॉवर , पाठिमागचा देठ आणि पानाचा भाग काढून टाकून १-२ किलो असे विकत होता. अच्छा!! म्हणून स्वच्छ करून होय!
असे कितीतरी ठेवणीतल्या आवाजांशी मी संबंधीत होते. खास करून मटकि मावशी, तो पेप्पॉर वाला... नाही म्हंटलं तरी या आवाजांची एकप्रकारची सवय झाली आहे. कितीही कर्कश्श किंवा ठेवणीतले असले तरी त्या आवाजात एक प्रकारचं चैतन्य आहे. इथे अमेरिकेत ना कोणी पेप्पॉरवाला.. ना..... अंडि ऽऽऽऽऽ असं ओरडणारा बोहारी. दुपारी सुनसान होतं जग सगळं.हे ठेवणीतले आवाज मात्र मनाच्या कुपित कुठेतरी दडलेले असतात आणि कधीतरी असे लेखांतून बाहेर येतात.
- प्राजु
0 प्रतिसाद:
टिप्पणी पोस्ट करा